बायको पाहिजे नोकरीवाली

 

बायको पाहिजे नोकरीवाली...

कोडगेगावापासून भकासवाडीकडे फुटणा-या रस्त्यावर दगडू टरफलेचं घर. गावापासून दिडेक किलोमीटरवर. थोडसं उंचावर. पत्र्याच्या दोन खोल्या, घरासमोर एक मोठी शिळा, त्या शिळेवर घरातले पुरूषमंडळी अंघोळ करायचे. बाजूला गोठा. एक गावरान गाई, दोन खिलारी बैलं, दोन शेळ्या, दहा-बारा कोंबड्यांचं खुराडं. घरासमोर एक लिंबाचं झाड, इतके वर्ष होवूनही ते काय वाढत नव्हतं. बहुतेक घरातल्याच माणसांचा गुण त्यानेही घेतलेला होता.

सकाळचे नऊ वाजले असतील. घरासमोर शेणानं सारवलेल्या परवरावर दगडू काडीनं दात टोकरत बसला होता. दगडूला दोन पोरं, गौतम व दत्तू दोघेही नोकरीला, गौतम नुकताच प्राथमिक शिक्षक म्हणून लागलेला होता, तर लहाना दत्तू मिलेट्रीत भरती झाला होता. त्यामुळं घरात दोघेच असत.

दगडू आपला विचार करत बसलेला होता की, आज बायकू काय पेरायला लावतीय. पाऊस पडून गेला होता. चांगली ओल झालेली होती. रानेही वापश्यावर आलेली होती. दगडूची बायको हौसाबाईच जरा त्यांच्यात हुशार होती. पण जरा कजाग होती. ती न्याहरीसाठी भाकरी थापत बसलेली होती. तिला अचानक आठवतं की बांधावरच्या काट्या, तरवड, शेतात आलेली रुईटी, आज तोडावी लागन, नायतर ती पेरणी झाल्यावर मंग तशीच राहीन. तशी तीनं दगडूला हाक मारली. “ आव्हं ऐकलं कां?” दगडू जाग्यावरूनच म्हणला “ काय गं! काय पेरायचं म्हणतीस?”

हौसाबाई “ आव्हं, पेरायचं नाय म्हणत म्या, तेवढी कु-हाड घेवून जावा, लई बोठलिया. आज सगळ्या बांधावरच्या काट्या कुट्या तोडून टाकू.” दगडू डोकं खाजवायला लागला. त्याला आसं व्यावहारिक काम म्हटलं की अंगावर काटाच यायचा. कारण गावात तो कधी जायचा नाही, लोकांत मिसळायचा नाही, आपलं पोटभर जेवावं आन ढोरासारखं राबावं. एवढंच त्याला जमत व्हतं. का कुणास ठाऊक त्यामुळे तो बाहेर काही कामाला जायचं म्हटलं तरी घाबरून जायचा. आताही त्याला ते काम नको वाटतं.

दगडू “ आगं पण, तुला माहितीय ना, मला नाय जमत असले कामं म्हणून!”

हौसाबाई “ त्यामुळंच येडं राहीलासा, आता ह्या कामाला बाया माणसाला पाठवता कां? गावातलं गडीमाणसं काय काय धंदं करत्यात, आन हे बसतय खुरड्यात त्वॉंड लपून कोंबडीगत!” तसा दगडूचा नाईलाज झाला.

दगडू “ सकाळ, सकाळी नको डोकं खाऊ गड्या, मंग मला भाकरी नाय चांगली जात.”

हौसाबाई “ दुसरं डोक्यात तरी काय येणार हाय तुमच्या! खायाला काळ आन भुईला भार. अशी गत हाय तुमची!” तसा दगडू कावून उठला.

दगडू “ आता जातो म्हणलं ना...! तरीपण का वटवट करतीस? काय करायचं ते सांग मला विस्कटून! नायतर चुकून बसनऑ म्या!”

हौसाबाई “ ती कु-हाड घ्यावा, शाळेच्या कोप-यात लोहार बसलेला हाये. तिथं जावा, आन ही कु-हाड शेवटून आणा! थोडेसे कोळसेपण घेवून जा. आन कु-हाड घेवून या, नायतर तिथंच इसरून येतान.” हौसाबाई एखाद्या लहान बाळाला समजावून सांगावं, तसं तिच्या नव-याला समजावून सांगू लागली. दगडूने आज्ञाधारक मुलाप्रमाणे मान हलवली. दगडूनं सगळं मन लावून ऐकायचा प्रयत्न केला, लक्षात ठेवायचा प्रयत्न करत राहिला.

त्याने उठून एका पिशवीत कोळसे घेतले व कु-हाड खांद्यावर टाकली. आणि तसाच उठून निघाला. तशी मागून हौसाबाईने हाक मारली. “ आतां काय कोपरीवरच जाणार काय? शर्ट घालून जावा. लोकं हसतील तुम्हाला!” दगडू हळूच पुटपुटला, आता काय उघडा चाललोय व्हय! पण ही म्हणजे हिडिंबा राकिसीनच हाय. सारखी दम देत राहती. म्या आपला ऐकून घेतो म्हणून... मला पार येडाच समजती! पण गप खुंटीला अडकवलेला शर्ट काढून अंगात घातला. कु-हाड व कोळस्याची पिशवी घेवून मान खाली घालून निघाला. मागून पुन्हा हौसाबाई हाक मारली, “ लवकर या, नायतर बसतान तिथंच संध्याकाळपर्यंत!” दगडूने चालता चालताच मान हलवली व गावाच्या रस्त्याला लागला.

तो गावात शाळेच्या कोप-याजवळ जावून एका दगडावर बसला. तिथंच एक तंबू ठोकून लोहार बाकीच्या लोकांचे कामं करत होता. गावातलेच दोन तीन माणसे त्याची हत्यारं घेवून बसलेली होती. दगडूला तिथं बराच वेळचा बसलेला पाहून लोहारानं त्याला हाक मारून विचारलं. “ कोण पाह्यजेय भाऊ तुला, बराच वेळचा बसलेला हायीस.”

दगडू “ काय नाय बायकू म्हणली होती, इथं शाळेच्या कोप-यात लोहार आसन म्हणून, इतक्या वेळेचा कोप-यात पाहत बसलोय. तिथं कोणीच बसलेलं नाय.”

त्यातलाच एकजन म्हणला, “ आरं ह्योच तर लोहार हे..त्यो काय नेमका कोप-यात जावून बसन व्हय.”

त्या सगळ्यांची कामं झाल्यावर लोहार दगडूला म्हणला, “ काय करायचं होतं?”

दगडू “ काय नाय कु-हाडीला धार मारून घ्यायचीय, पण पैसे किती घेणार?

लोहार “ कोळसे तुमचे असले तर, 3 रुपय आणि कोळसे माझे असले तर 5 रुपय.” दगडूने लोहाराकडं कु-हाड, कोळसे देवून टाकले. लोहाराने कु-हाड चांगली शेवटून दिली.

लोहार “ भाऊ, कु-हाड शेवटल्याचे पैसं द्या!”

दगडू पुन्हा विचारलं “ पण किती द्यायचे?”

लोहार “ आतां कोळसे तुमचे होते, म्हणून द्या तीन रुपय!”

दगडू “ नाय नाय कोळसे तुमचे कशाचे? कोळसे माझे होते? तू काय म्हणला, कोळसे माझे असल्यावर किती पैसे द्यायचे?” तसे लोहार व जमा झालेले दोघं-तिघं विचित्र नजरेनं दगडूकडं पाहू लागले.

लोहार “ आरं भाऊ, कोळसे तुमचेच होते, म्हणून 3 रुपय द्या.”

दगडू “ तुला म्हणलो ना कोळसे माझे होते म्हणून? मला सांग कोळसे माझे असल्यावर किती पैसे द्यायचे?” तसे बाकीचे आता दगडूच्या वेडेपणाला हसायला लागले.

लोहार “ बरं बाबा, कोळसे माझे असल्यावर 5 रुपय द्यायचे!” लोकं अजूनही हसत होती.

दगडू “ आंग अशी.. तुला काय मी येडा वाटलो काय? मला फसवायला निघाला होता.” दगडूने स्वतःवरच खूश होवून लोहाराला 5 रुपय देवून कु-हाड घेतली. कु-हाड खांद्यावर टाकून ऐटीत घराकडं निघाला. लोहार व बाकीचे लोकं त्याला हसत राहिले.  

असा हा दगडू टरफले, सगळं दुसरे सांगतील तसच वागणारा. तरूण असतानाच त्याला कोणीतरी सांगितलं, की बत्तीस वेळा घास चावला की चांगली तब्येत व्हती. तेंव्हापासून तो प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खातो. त्यामुळे त्याला जेवायला चांगला दिडेक तास वेळ लागतो. त्याच्या ह्या जेवण्यामुळे कामाला लावलेल्या मजुरांची मात्र मजा होते. जेवायच्या सुट्टीत मजूरपण बळच वेळ काढत, गप्पा मारत जेवत बसत. तसा हौसाबाईचा तिळपापड होत असे.

हा असा दगडू असल्यावर, घरातला सगळा कारभार हौसाबाईवरच येवून पडला होता. दोन्हीही पोरं लग्नाला येवून ठेपली होती. पण त्याची दगडूला आजिबात काळजी नव्हती. त्याला तशी कशाचीच काळजी वाटत नसे. त्यामुळे त्याची तब्येत चांगली दणकट झाली होती. त्याला पोरांच्या लग्नाबद्द्ल विचारलं की, तो एवढंच म्हणायचा आरं देवाच्या मनात आसंल! तसंच व्हतं बाबा! आपण कोण जमवणार! त्याला वाटन, तव्हा चट जमंन, आपण काळजी करायची नाय!” त्याच्यामुळं गौतमचं वय पंचवीस ओलांडून गेलं होतं, तसं बाकीच्याच नातेवाईकांना वाटू लागलं, की एवढं पोरगं नोकरीला आसून तसच पडलंय, आपणच काहीतरी करायला पाह्यजे.

तसा हा गौतम ही लहानपणापासूनच अगदीच नेभळट, कसा पण राह्यचा. लहान असताना नाक कायमच बारमाही नदीसारखं वाहत असायचं. चड्डीचं हुक ब-याचवेळा तुटलेलेच असायचं. मंग तो चड्डी करदो-याने धरून ठेवत असे. शाळेत असताना त्याला त्याचं नाव काढायला शिक्षकांनी कितीतरी वेळा शिकवलं, पण हा स्वतःचं नाव, गवतम टरफले असंच लिहायचा. त्यामुळे सगळे पोरं त्याला हसायचे, पण ह्याने बरेच दिवस ते काय लिहायचं सोडलं नाही. ह्या सगळ्या कारणामुळे त्याला शाळेत जास्त मित्रही मिळाले नाहीत.

मोठा झाला तरी त्याचा नेभळटपणा काय कमी झाला नाही. लहानपणापासूनच तो चांगली तब्येत ठेवून होता, बापासारखाच. पण बापाचं शरीर कामानं घोटीव बनलेलं होतं. तर हा मुरमु-याच्या पोत्यासारखा गोलगरगरीत झाला होता. त्यातच पुढचे चार दात बाहेर आलेले होते. तो खूप हुशार होता असंही काही नाही, पण समजू नायतर नाय समजू, तो नुसता पाठ करत राह्यचा. त्यामुळे त्याला इंग्लिश आणि गणित सोडून सगळ्या विषयात चांगले मार्क पडायचे. म्हणून दहावी सुटल्यानंतर त्याने सायंन्स न घेता आर्ट्ला प्रवेश घेतला. आणि बारावीला चागले मार्क पाडून डि.एड.ला नंबर लावला. डि. एड. झाल्यावर त्याच्या नशिबाने त्याला प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीपण लागली. बाहेरच्या जिल्ह्याच्या ठिकाणी. त्यामुळे कधीतरी दोनतीन दिवस सुट्टी टाकून तो गावाकडे येत असे.

आता गौतमला नोकरी लागून चारपाच वर्ष होवून गेली होती. त्यालापण लग्न करावसं वाटत होतं. शिक्षक होवूनपण त्याच्यात मात्रं काहीच बदल झाला नव्हता. डोक्यावरच्या केसांनी अर्धचंद्रासारखा आकार घेतला होता. पंधरा दिवसानंतरच दाढी करत होता. आता पॅन्ट घालायला लागला होता. जवळच्या नातेवाईकांनी त्याला लग्नाबद्दल विचारलं, तुला मुलगी कशी करायचिय? तुझ्या काही अपेक्षा हायेत कां? आधीच सांगून ठेव, त्यानुसार आम्हाला मुलगी पाहायला!

गौतमने स्पष्ट शब्दात सांगितलं, मला पोरगी कशीबी आसली तरी चालंन, पण ती नोकरीवाली आन गोरी पाह्यजे.

परत एकाने विचारलं, आरं पण पोरगी नोकरीवाली पाह्यची म्हणल्यावर, तिला घरी राहता यायचं नाय, त्यात तुझी नोकरी अशी लांब! आन पोरगी गोरीच का बरं करायची. बाकीच्या पोरी काय चांगल्या नसत्यात कां?”

यावर गौतम म्हणला, “ डबल पगार असल्यावर ती कुठं का असाना काय करायचंय. घरी ठेवून तरी, तिला काय खारू घालायचय व्हय. हायीत की घरी आई आन भाऊ! आन पोरगी गोरी करायची कारण म्हणजे आम्ही घरातले सगळेच काळे सावळे आहोत. आमचे पोरंपण आसेच व्हायला नको. नायतर काळी पोरगी असल्यावर तिचं लग्न कारायला लय तान होतो.

“ आरं गौतम काय बोलतो तू? आता काळ बदलत चाललाय! तू आसं म्हणल्यावर मंग काळ्या पोरींनी काय तसंच राह्यचं व्हय?”

गौतम “ त्यांनाबी मिळतील की, त्यांच्यासाठी काय मी एकटाच हाय व्हय! आपलं हे फायनल हे... आपल्याला पोरगी करायची तर नोकरीवाली आन गोरीच!” बरं ठीक हे म्हणून नातेवाईक त्याला पोरी पाहू लागले. त्याच्या नशीबाने त्याला स्थळंपण बरेच सांगून यायला लागले.

एकदिवस तालुक्याच्या गावाहूनच मुलगी पाहण्यासाठी गौतमला निमंत्रण आलं. प्रत्यक्ष मुलीच्या वडिलांनी गौतमला पाहून, त्याचं घरदार पाहून, त्याला निमंत्रण दिलेलं. मुलगी सुंदर आहे असं त्याला कळलं. एवढं सगळं ऐकल्यावर त्याला आकाशच ठेंगणं वाटायला लागलं. काहीतरी करुन एवढं जमायलाच पाहिजे म्हणून त्याने गावातल्याच आपल्या मित्रांना सांगितलं की, तुम्ही माझ्या बरोबर पोरगी पाहायला यायचं.

त्याचे ते मित्रं म्हणजे दिनेश, प्रकाश व रघू असतात. आता गंम्मत म्हणजे हे तिघेही दिसायला चांगले आणि त्यांच्यात गौतमच वेगळा पडत होता. पण तोच नवरदेव. दिनेश हा पण शिक्षकच होता. बिनलग्नाचा होता. दिसायला पण सगळ्यात चांगला होता. प्रकाश व रघू हे दोघेही शेतीच करत होते.

रविवारचा सुट्टीचा दिवस मुलगी पाहायला जायचा ठरला. गौतमने सगळ्यांनाच सकाळी लवकर उरकून यायला सांगितलेलं. हे तिघेही व्यवस्थित कपडे इस्त्री करून, इन करून, अत्तराचा फवारा बिवारा मारून सकाळीच गौतमच्या घरी आले. जनू यांनाच पोरगी पाह्यची होती. पण नवरदेवापेक्षा त्याच्याबरोबरच्या मित्रांनाच पोरगी पाहायची म्हणजे जास्त मुड असतो. गौतमही मुलगी पाहायला जायचं, म्हणून त्याच्या पद्धतीनुसार आवरून बसलेला होता.

दिनेश “ गौतम, आरं ही पॅंट गुढग्यावर उसवली यार.. ! आणि ही घालून तू पोरगी पाह्यला जाणार कां? त्याबरोबर सगळयांनिच त्याला ती पॅंट बदलायला सांगितलं, पण त्यानं काय ऐकलं नाही.

गौतम “ आरं येडे हे कां काय रं तुम्ही? ती थोडीच माझ्या पॅंटीकडं पाहत बसणारे... माझ्या चेह-याकडं पाहीन कां पॅंटीकडं? काहीपण सांगता राव!”

प्रकाश “ आरं आता कसं सांगाव भौ.. तुला! त्याच्यामुळंच आत्तापर्यंत तुला कोणत्या मुलीनं पसंत केलं नाही. तू आता गप बस आम्ही सांगतो तसं ऐक! आन पॅंट बदल.”  नाईलाजानं गौतमनं पॅंट बदलली. दिनेशनं पुन्हा त्याला पाहिलं. गौतमची दाढी वाढलेली. पावडर वगैरे लावायचा तर काही प्रश्नच नव्हता.

दिनेश “ ये गौत्या, येवढा कसा रं बावळट तू? पोरगी पाह्यला जायचं म्हणल्यावर, कसं इंप्रेशन पडंन असं जायला पाह्यजे कां नाय, तुला पाह्यल्या पाह्यल्या ती म्हणंन काय गबाळा माणूस हे हा! आरं चांगले कपडे इस्त्री करायचे, इन करायची. दाढी बिढी करून, अत्तर, पावडर मारून टकाटक व्हायचं. गेल्या गेल्या त्यांना नुसत्या अत्तराच्या वासानं असं वाटलं पाह्यजे, ह्यांच्यातला नवरदेव ह्योच! आरं, एका मिनिटात तुला पसंद करायला पाह्यजे! बाकीचं काही विचारायलाच नको! काय रं गड्यांनो!”

गौतम “ म्हणजे कपडे चांगले घातल्यावर इंप्रेशन पडतं व्हय कुठं! एवढा मी शिक्षक हे... शेती हे.. तब्येत कशी हे.. हे नाय का पाहत ते!” तसे हे हसायला लागले.

प्रकाश “ हे सगळं तिच्या घरचे पाहतेत. पोरगी दुसरंच पाहत असते. तेवढं तुला कुठलं ज्ञान म्हणा! पोरीला तर दिसताक्षणी तू आवडायला पाह्यजे. त्यात तुझी तब्येत जरा जास्तच चांगली हे..!” हे सगळं गौतमच्या डोक्यात काही बसत नव्हतं. तरीही जेवढा नवरदेव सजवता येईन, तेवढा सजवायचा प्रयत्न त्याचे मित्रांनी केला. आणि हे दोन मोटारसायकलवर दोन असे पोरगी पाह्यला निघाले.

तालुक्याला पोहचल्यावर गौतमचे मित्रांनी गौतमला दाढी करायला लावली. यांचं बाहेरच ठरलं, कोणी पोरीसमोर बसायचं, काय काय प्रश्न विचारायचे. रघूने प्रश्न विचारायचे असं ठरलं, बाहेरूनच अर्धा किलो पेढे व नारळ घेवून हे गेले. पहिल्यांदाच गौतम जरा ब-यापैकी होवून मुलगी पाहायला चाललेला. तो खूपच उत्साहात होता.

हे सगळं व-हाड मुलीच्या घरापुढं जावून थांबलं. गाडीच्या आवाजाने यजमान हात जोडत बाहेर आले. इकडून तिकडून रामराम सामसाम झालं. गौतम पटकन उतरून तडातडा घरात सोफ्यावर जावून बसला. त्याच्या मित्रांना एकदम अवघडल्यासारखं झालं. सगळे घरात येवून सोईस्कर जागा पकडून बसले.

मुलीचे वडील, चुलते, चुलतभाऊ असे चारपाचजन त्यांच्याकडचे होते. ओळख पाळख झाली. एक पोरगा, बहुतेक नवरीचा भाऊ असावा त्यानं सगळ्यांना पाणी आणून दिलं. गौतमनं घटाघटा एक तांब्याभर पाणी पिवून टाकलं. गौतमचं लक्ष सारखं मागच्या दरवाज्याकडं होतं.

औपचारिक गप्पा सुरू झाल्या. तुमच्याकडं पाऊसपाणी कसं काय? औंदा पाऊसानं चांगलच आखडून धरलय.. शेतात काय काय पिकं हायेत. अशा गौतमच्या दृष्टीनं फालतू गप्पा चाललेल्या. गौतमला त्या गप्पात अजिबात रस नव्हता. त्यानं आपलं शरसंधान दरवाज्यावरच लावलेलं. कधी पोरगी बाहेर येते आन तिचं मुखकमल दिसतं असं त्याला झालेलं. तो एकदम अवघडून बसलेला. हे बहुतेक मुलीच्या वडिलांच्या लक्षात आलं.

मुलीचे वडील “ आतां काही हरकत नाही, आमच्या नंदूला बोलवायला! वेळही बराच झालेला हे..” तसा गौतम कासाविस झाला.

गौतम “ अवो.. नाय, नाय, आम्ही पोरगी पाह्यला आलो व्हतो, कुणा नंदूला नाही.” तसे त्यांच्याकडचे सगळेच हसायला लागले. गौतमच्या मित्रांना काय करावं सुचेना, ते आपले गप मान खाली घालून बसले.

मुलीचे वडील “ अवो नंदू म्हणजे आमची पोरगीच हे..तिला आम्ही प्रेमानं नंदू म्हणतो तसं तिचं नाव सुनंदा हे..” तसा गौतमच्या जीवात जीव आला. शेजारीच बसलेला दिनेश गौतमला हळूच म्हणला, आरं गौत्या, कशाला स्वतःहून आपलीच चव घालतो रं.. आता त्यांनी पोरगी पाहायला बोलावलं म्हणल्यावर पोरगा कशाला दाखवतेन. तू जरा गप बसतो कां?”

गौतम त्याला म्हणला, “ आरं मला वाटलं नंदू म्हणजे पोरगाच हे..म्हणून बोललो, दुसरं काय नाय!” पण गौतम एवढा उत्साही झालेला की तो गप राहतच नाही, आणि त्याच्या मित्रांना वाटतं, झक मारली अन आपण ह्याच्याबरोबर पोरगी पाह्यला आलो.

मुलीचे वडीलांनी आत पाहून हाक मारली, “ ये.. नंदूची मम्मी, आवरलं कां? चला लवकर पाव्हणे वाट पाहतेत.” तशी आतमध्ये लगबग चालू झाली. गौतम एकदम सावरून बसला. सुनंदा हळूहळू पाय मोजीत हातात पाण्यानं भरलेला तांब्या घेवून आली, तिच्या बरोबर कोणीतरी लहान एक पोरगी पण होती. सुनंदा खरोखरच सुंदर, गोरीपान होती.

अचानकच गौतमला काय झालं, काय कळलं नाही. तो विजेचा झटका बसावा तसा ताठकन उठला, एकदम सुनंदाच्या हातातला तांब्या काढून घेतला. व खाली ठेवून दिला. सगळेच गौतमकडं काय ध्यान हे अशा नजरेनं पाहायला लागले. सुनंदा या गौतमच्या हल्ल्यानं एकदम गडबडून गेली. गौतमचे मित्रं या गौतमचं काय करावं? अशा नजरेनं पाहत होते. गौतम तांब्या खाली ठेवून, पुन्हा सोफ्यावर जावून बसला. दिनेशनं त्याला हळूच विचारलं, “ गौत्या काय येडाय कां? का रं तू? एकदम तिच्या हातातला तांब्या कशाला हिसकावून घेतलास? आरं काय वाटलं आसन सगळ्यांना!” गौतम त्याला म्हणला, आरं मला वाटलं, तिला त्यो तांब्या जडच झालाय, त्याच्यामुळं ती हळूहळू चाललीय, म्हणून म्या घेतला, दुसरं काय नाय!” दिनेश आपल्या डोक्याला हात लावून बसला.

सुनंदा हळूच पाटावर जावून बसली. रघू उठून पेढ्यांचा बॉक्स, नारळ घेवून तिच्यासमोर बसला. एकमेकांना गंध लावल्यानंतर मुलीचे वडील म्हणले काही मुलीला प्रश्न विचारायचे असल्यास विचारा. पुन्हा गौतमला जोर आला, त्याच्या एवढंपण लक्षात राहत नाही की प्रश्न रघूला विचारयला सांगितलेत.

गौतम “ तुमचं नाव काय?”

सुनंदा “ सुनंदा मधुकर टकले.” तिचं आडनाव ऐकल्याबरोबर तो मुलीच्या वडिलांच्या डोक्याकडं पाह्यलं. त्याला आडनावाची प्रचिती आली. दिनेश त्याला गप बसायला खुणावत होता, पण गौतम त्याच्याकडे लक्षच देत नव्हता. रघू आपला गप मुग गिळून बसून राहिला. तसा गौतमनं परत प्रश्न विचारलं.

गौतम “ तुमचं वय किती?”

सुनंदा पहिल्यांदा या प्रश्नावर दचकूनच जाते. कारण कुणी वय काय झालय असा प्रश्न विचारत नसतं, जन्मतारीख विचारतात, म्हणून तिने तसेच प्रश्न पाठ केलेले. तीनं थोडावेळ हिशेब केला व सांगितलं, “ माझं वय वीस झालेलं आहे.” तसा गौतम खूश होवून म्हणतो, “ आरं वा..माझं वय तर सत्तावीस हे... म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान हायेत. लईच भारी काम!” गौतमची मित्रमंडळींना इथून पळून जावसं वाटतं. यजमानांना वाटतं कुठून बुद्धी झाली अन ह्या येड्याला बोलावलं.

सुनंदाही आत्तापर्यंत दिनेशकडेच नवरदेव म्हणून पाहत असते, गौतमच्या बोलण्यामुळं तिलाही कळतं की नवरदेव म्हणून ह्यो येडा पाहयला आलाय, तिचा फ्रेश चेहरा एकदम उदास होवून जातो. पण गौतम मात्रं वेगळ्याच जगात वावरत असतो. तसा तो पुन्हा पेटतो.

गौतम “ तुमच्या आईचं नाव काय?” सुनंदा मनात म्हणते काय टरमाळंहे.. ह्याला कशाला पाहिजे आईचं नाव! पण नाईलाजाने कसंतरी तोंड करून सांगते, “ मधुबाला..” असं खोटच नाव सांगून टाकते. त्यांच्याकडचे हसायला लागतात. गौतमचे मित्रं मात्रं अवघडून बसलेले असतात.

गौतम “ मधुबाला... लईच भारी राव..हे तर नटीचं नाव हे..” ह्यांच्या प्रश्नोत्तराच्या खेळात मात्रं गौतमचे मित्रं मात्र कोंढवाड्यात घातल्यासारखे बसलेले असतात. तिच्या वडिलांना, चुलत्यांना कळत नाही की आता ह्यांना कसं थांबावावं. रघू प्रश्न विचारायला म्हणून बसलेला पण गप मान खाली घालून बसलेला असतो. गौतमची गाडी मात्रं सुसाट सुटलेली असते. गौतम काहीपण प्रश्न विचारत राहतो, सुनंदापण तशेच उत्तर देत राहते.

थोड्यावेळानंतर गौतमच तिला म्हणतो, “ आता तुम्ही मला प्रश्न विचारा. मी उत्तर देतो.”

 सुनंदा “ मला काही नाही विचारायचं!”

गौतम “ काय घाबरू नका तुम्ही! सगळी माणसं आपलीच हायेत! विचारा.. विचारा.. बिनधास्त विचारा.” तशी तिलापण वाटतं, ह्याची जरा मजाच करावी. ती पण बरीच चॅप्टर असते.

सुनंदा “ तुम्ही लहानपणापासून आसेच आहेत कां? कां काही ठरावीक काळात असे असतां?” तसा गौतम गरबडून जातो. पण धीर करून बोलतो.

“ लहानपणापासूनच असाच हे मी.. आता मोठा झाल्यावर थोडा आणखी हुशार झालोय.” तसे सगळ्यांनाच हसू आवरत नाही. पण कसेबसे तोंडावर हात ठेवून हसत राहतात. सुनंदापण खुदूखुदू हसत असते. गौतमचे मित्रं तोंडात हाणल्यासारखे बसलेले असतात. त्यांना वाटतं, सितेला जसं धरणीमातेनं गिळून घेतलं, तसं आपल्याला पण गिळून घ्यावं. पार चव घातली ह्या गौत्यानं.

सुनंदा परत विचारते, तुमची जन्मवेळ काय हे?” आता सगळे कौतुकाने सुनंदाकडे पाहत असतात.

गौतम “ माझ्या आईलाच माहिती नाय तर, मला कशी माहीत आसन!” तशे आता सगळेच मोठ्यानं हसायला लागतात. मित्रांची अवस्था पाहण्यालायक झालेली असते.

सुनंदा परत प्रश्न विचारते, “ आव्हं पण, मला स्वयपाक येत नाही बरं कां? चालन कां तुम्हाला?”

गौतम “ काय हरकत नाय, पगार हाये ना तुम्हाला? मंग काय मी शिकवीन तुम्हाला!” परत सगळे हसत राहतात. तिच्या वडिलांनाच वाटतं, नको आणखी वाढवायला. मध्येच ते म्हणतात, “ बरं बास करा आता तुमचा प्रश्नोत्तराचा खेळं! सगळ्यांनाच भुका लागलेल्या हायेत.” तशी सुनंदा उठून आत निघून जाते. गौतमला वाटतं बरं चाललं होतं. समोरतरी सुनंदा बसली होती. पण नाईलाजानं गप्प बसून राहतो. त्याच्या मित्रांना मात्रं ती आत गेल्यावर सुटल्यासारखं वाटतं.

मघाचं पोरगं पोहे, शिरा असलेल्या बश्या घेवून येतं. आतून हसण्या-खिंदळण्याचा आवाज येत असतो. गौतमचे मित्रं कसेतरी पोहे शिरा पटापट खात असतात. त्यांना वाटत असतं की जेवढं लवकर इथून सट्कतोन तेवढं बरं. पोहे खाता खाता सुद्धा गौतम दरवाज्यातून आत पाहायचा प्रयत्न करत असतो. पण पुन्हा काय सुनंदा बाहेर येण्याचं कारण नसतं. सगळ्यांच्या बश्या रिकाम्या झाल्या तरी गौतम मात्रं हळूहळूच खात असतो. नाईलाजानं सगळ्यांनाच त्याची बशी संपण्याची वाट पाहत बसाव लागतं. एकदाचं त्याची बशी रिकामी होते. तसा दिनेश उठतो.

“ बरं पाव्हणं निघावं कां आम्ही! घरीही जरा कामं हायेत.”

गौतम “ आरं थांब एवढी काय घाई हे ..जाऊ की सावकाश!” बाकी सगळेच गालातल्या गालात हसत गौतमकडे पाहत असतात.

रघू “ तू तर काय इथंच मुक्काम करायचा म्हणलं तरी थांबशीन पण आम्हाला कामं हाईत भौ...” तशे मुलीचे वडीलपण गडबडून जातात.

मुलीचे वडील “ नाय, नाय, मला ही जरा बाहेर काम हे... तव्हा या मंग आता!” आता मात्रं गौतमचा नाईलाज होतो. अजूनही तो दरवाज्याकडंच पाहत असतो. दरवाज्यात त्याला कोणीच दिसत नाही. त्याचे सगळे मित्रं बाहेर पडलेले असतात. त्याला बाहेर पडण्याशिवाय मार्ग राहत नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचा रामराम होतो. दिनेश व रघू गाडी चालू करतात. दिनेश गौतमला हाक मारतो, “ चल रे गौतम आता! बराच उशीर झालाय!” तसा नाईलाजानं गौतम पुढं होतो.

गौतम मुलीच्या वडिलांना म्हणतो, “ चला पाव्हणं! येतो तर आम्ही! कळवू काय आसन ते नंतर!” मुलीचे वडील हसत हसत म्हणतात, “ बरं ठीक हे.. या आता तुम्ही!” गौतम मान वळून अजूनही दरवाज्याकडे पाहत असतो, पण त्याची साफ निराशा होते.

दिनेश व रघू पटकन गाडीला किक मारून तिथून बाहेर पडतात. तेंव्हा त्यांना जरा सुटल्यासारखं होतं. बाहेर निघल्यावर एका झाडाच्या सावलीखाली गाड्या थांबून सगळेच गौतमवर घसरतात.

दिनेश “ तुला काही अक्कल हे कां? गौत्या, काय बोलतोस? काय करतोस? काही कळतं कां नाही? थोडासुद्धा सेंस नाही कसं बोलावं ते!”

रघू “ उतावळा नवरा अन गुढग्याला बाशिंग! जणु काय सगळं काही तुच ठरवल्यासारखं बोलत होता. आरं ती पोरगी तुझी फिरकी घेत होती. एवढंबी तुझ्या लक्ष्यात येवू नाय व्हय रं.” सगळेच त्याच्यावर तोंडसूख घ्यायला लागतात.

गौतम “ आरं, म्या त लई भारी उत्तरं दिली राव!”

प्रकाश “ लई भारी उत्तरं दिली! जणू आसं वाटत व्हतं की खनाखन आमच्या तोंडात कुणीतरी वाजवतय. आन एवढं होवूनबी त्यांना म्हणतोय तुम्हाला नंतर कळवतो. त्यांनी कळवलेलं तुला कळलं नाय व्हय!”

गौतम “ तरी मला वाटलच व्हतं तुम्हाला मित्राचं चांगलं झालेलं बघवणार नाय म्हणून!”

दिनेश “ म्हणजे तुला काय वाटतं, अजूनबी तुला ते होकार देतेन व्हय. तुला जर त्यांनी होकार दिला ना तू म्हणशील ती पैज तुला देईन!”

गौतम “ आरं, माझं जर मोडलं ना... ते पण तुमच्यामुळंच मोडंन! मलाच कळायला पाह्यजे व्हतं, नवरदेवापेक्षा दिसायला चांगले जोडीदार घेवून कधी पोरगी पाह्यला जावू नाय, इथून पुढं तुम्हाला कधीच घेवून जाणार नाय भौ..”

दिनेश “ पहा चोराच्या उलट्या बोंबा! आणि आम्हाला तरी कुठं परत तुझ्याबरोबर यायची हौस राह्यलीय.”

येवढ्यावरच त्यांचं संभाषण बंद होतं. जोरात गाडी पिटाळत, सगळे आपआपल्या घरी येतात. साहजिक मुलीकडून होकार येण्याचं काही कारणच नसतं. त्याच्यानंतर मात्रं गौतम मुलगी पाह्यला ह्या मित्रांना घेवून जात नाही. त्याचीही तो राहण्याची पद्धत बदलत नाही. गौतम पोरी पाहायचा, त्याला सगळ्याच पोरी आवडायच्या, सगळ्यांनाच तो होकार देवून यायचा, पण त्याला कोणती नोकरीवाली पोरगी होकार देत नव्हती. असेच दोन वर्ष तो पोरी पाहत बसतो. पण त्याला काय कोणती पोरगी होकार देत नाही. . तो ही पार पोरी पाहून पाहून वैतागून जातो. आता पोरगी गोरीच पाह्यजे ही अट त्याने शिथील केलेली असते. पण अजूनही बायको नोकरीवालीच पाहिजे यावर मात्रं तो ठाम असतो.

 आणि एकदिवस गौतमच्या वडिलांचे मावसभाऊ, त्यांच्या घरी येतात. त्यांचा पंचक्रोशीत लग्न जमवण्यात हातखंडा असतो व गौतमला ते म्हणतात, हे पाह्य गौत्या, आता बास कर तुझं पोरगी पाहणं! तू जर अशा पोरी पाहत बसला तर आयुष्यभर तसाच राहशीन! तुला काय फक्त नोकरीवालीच पोरगी करायची ना.. मंग मी पाहतो काय करायचं ते! तू गप मंडपात उभा राह्यचं! कबूल कां?” गौतमपण पोरी पाहून वैतागलेलाच असतो.

गौतम “ बरं ठीक हे.. पण पोरगी चांगली पहा बरकां काका!”

“ तुला लग्न करायचय ना.. मंग गप राह्यचं!” गौतम खरच गप राहतो.

शेजारच्याच गावातली एक पोरगी, पोरगी कसली बाईच! बिनलग्नाची राह्यलेली असते. ती खूपच जाड असल्याने तिलाही कुणी पसंत करत नसतं. आणि यालाही कुणी पसंत करत नसतं. मंग असा जोडा एकमेकांना न दाखवताच मंडपात उभा करतात. मंडपात तिला गौतमने पाहिल्यावर तो नाय नको म्हणतो. पण जर हिच्यासंग लग्न नाय केलं तर आयुष्यभर तसाच राहशीन, असं म्हणल्यावर तो गप बोहल्यावर चढतो. त्यांचं लग्न होतं. संसार सुरु होतो.

कोणीतरी गौतमला चिडवण्यासाठी नाव घ्यायला लावल्यावर तो म्हणतो, तिकडून आला काळ्या, काळ्या म्हशींचा घोळका, आन त्यातून माझ्या मंदीला ओळखा!”

मंग त्याची बायकोही ठेक्यात नाव घेते, “ आहेरावर आहेर! नववारी साडीचा आहेर, गौतमरावांचं नाव घेते, त्यांचे दात बाहेर!” तसे सगळेच त्यांना हसत राहतात. आणि आपला गवतम टरफले बायकोकडं पाहून खुदूखुदू हसत राहतो.

:- मनोहर काळोखे

टिप्पण्या